मास्टरकार्डचे पुण्यात जगातील सर्वांत मोठे आधुनिक तंत्रज्ञान केंद्र; तब्बल ६००० जणांना रोजगाराची संधी
- Marathi News\ PUNE:
मास्टरकार्डचे पुण्यात जगातील सर्वांत मोठे आधुनिक तंत्रज्ञान केंद्र; तब्बल ६००० जणांना रोजगाराची संधी
मास्टरकार्ड कंपनीने पुण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. कंपनीच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात हे केंद्र महत्वाची भूमिका बजाविणार आहे.

पुणे : मास्टरकार्ड कंपनीने पुण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. कंपनीच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात हे केंद्र महत्वाची भूमिका बजाविणार आहे. या ठिकाणी सुमारे सहा हजार तंत्रज्ञ आणि अभियंते कार्यरत असल्याने हे मास्टरकार्डचे हे जगातील सर्वांत मोठे तंत्रज्ञान केंद्र ठरले आहे.
मास्टरकार्डचे अध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी एड मॅकलॉघ्लिन यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्धाटन मंगळवारी झाले. यावेळी बोलताना एड मॅकलॉघ्लिन म्हणाले की, मास्टरकार्डच्या जागतिक तंत्रज्ञान धोरणात पुण्यातील केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावेल. आमच्या जगभरातील तंत्रज्ञान विभागांमध्ये हा महत्वाचा दुवा असेल. हे केंद्र इतर तंत्रज्ञान केंद्रासोबत जगाला आकार देणाऱ्या आणि अर्थव्यवस्थांना भक्कम करणाऱ्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाची उभारणी करेलया केंद्रात सॉफ्टवेअर विकासापासून, वित्त, विदा, विदा संरचना आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातील तंत्रज्ञ कार्यरत असतील. सध्या मास्टरकार्डची पुण्यासह अर्लिंग्टन, डब्लिन, न्यूयॉर्क, सेंट लुईस, सिडनी आणि व्हँक्यूव्हर येथे तंत्रज्ञान केंद्र आहेत. पेमेंट सुरक्षा, सायबर सुरक्षा, फसवणुकीचा शोध आणि डिजिटल ओळख या माध्यमातून मास्टरकार्डच्या जागतिक सेवेत योगदान देईल. याचबरोबर भारतात वित्तीय समावेशनासाठीचा कम्युनिटी पास मंच आणि पेमेंट पासकी सेवेची सुरूवात करण्यात हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल.
मास्टरकार्डचे दक्षिण आशिया अध्यक्ष गौतम अग्रवाल म्हणाले की, भारत मास्टरकार्डसाठी अतिशय महत्वाचा आहे. आम्ही डिजिटल अर्थव्यवस्थेला संपूर्ण खंडात कार्यान्वित करण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानासाठी भारतात गुंतवणूक केली आहे. पुण्यातील आमचे नवीन तंत्रज्ञान केंद्र हे एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील आमचे कर्मचारी जागतिक तांत्रिक प्रगतीला पाठबळ देत आहेत. याचबरोबर भारत सरकारची महत्त्वाकांक्षी डिजिटायझेशन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसह काम करण्यास उत्सुक आहोत.
पुणे तंत्रज्ञान केंद्रात मास्टरकार्डचे कर्मचारी जगासमोरीलगुंतागुंतीच्या तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य करतात. यामुळे सुरक्षित, अखंड, आणि कार्यक्षम व्यवहारांसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची विश्वसनीयता निश्चित होते.