दौंडच्या वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा!

दौंडच्या वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा!

दौंड,(माझा इंडिया न्यूज) Daund Pune:
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे. दौंड वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्यापपर्यंत दौंड वन विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. असा आरोप करत शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी नांदखिले यांनी दौंड वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पट्ट्यासह पुणे सोलापूर महामार्गा लगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे कुटुंब दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करण्याचे सत्र सुरूच आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी आणि शेतमजूर शेतात काम करण्यास घाबरत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
या संदर्भात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद करण्यासंदर्भात दौंड वन विभागाला काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. दौंड वनविभाग पिंजरा लावण्याबाबत हलगर्जीपणा करत आहे. या संदर्भात ९ ऑगस्ट रोजी महसूल आयुक्त पुलकुंडवार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. वन विभागाला पिंजरा लावण्या संदर्भात आदेश दिला जाईल असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. परंतु यावर काहीच कारवाई केली गेली नाही.
नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याने एखाद्या शेतकरी, ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिलांवर हल्ला केला आणि यामध्ये त्यांचा बळी गेला तर त्यास जबाबदार कोणाला धरायचे? असा सवाल शिवाजी नांदखिले यांनी निवेदनात केला आहे. वनविभाग सुस्त झाले असून काहीच कामाचे नाही जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे वनविभागाला लक्ष देण्यास वेळ नाही ही बाब चिंतेची आहे. दौंड वनपाल व दौंड उपविभागीय अधिकारी व शेतकरी संघटना या तिघांची बैठक येत्या ८ दिवसात घेऊन पिंजरा लावण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अन्यथा शेतकरी संघटना वनपाल दौंड विभाग यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करेल.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास वन विभाग जबाबदार असेल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. या संदर्भातील निवेदन दौंड उपविभागीय अधिकारी, तालुका वन अधिकारी, दौंड पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे अशी माहिती शिवाजी नांदखिले यांनी दिली.